Best News Portal Development Company In India

बेन्नितुरा नदीच्या पुलाला भगदाड ; आमदार प्रविण स्वामींकडून प्रत्यक्ष पाहणी, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना तत्काळ दुरुस्तीचे आदेश!

बेन्नितुरा नदीच्या पुलाला भगदाड ; आमदार प्रविण स्वामींकडून प्रत्यक्ष पाहणी, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना तत्काळ दुरुस्तीचे आदेश!
​उमरगा / लोहारा (प्रतिनिधी: आदिनाथ भालेराव)
सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर येणेगुर ते तुगांव दरम्यान असलेल्या बेन्नितुरा नदीवरील पुलावर मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत आमदार प्रविण स्वामी यांनी गुरुवारी (दि. १६) प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
​प्रकल्प संचालकांना धारेवर धरले
​पुलाची दुरवस्था आणि पडलेले भगदाड पाहून आमदार स्वामी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी तत्काळ नॅशनल हायवेचे प्रकल्प संचालक श्री. कासार यांच्याशी संपर्क साधून पुलाच्या दुरुस्तीबाबत कडक सूचना दिल्या. पुलावरील भगदाड तातडीने बुजवून वाहतूक सुरक्षित करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
​अपूर्ण कामांबाबतही आक्रमक पवित्रा
​केवळ पुलाची दुरुस्तीच नव्हे, तर महामार्गावरील इतर प्रलंबित प्रश्नांवरही आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामध्ये प्रामुख्याने:
​महामार्गाचे अपूर्ण राहिलेले काम त्वरित पूर्ण करणे.
​अपूर्ण असलेले सर्व्हिस रोड तातडीने मार्गी लावणे.
​राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या राज्यमार्गावरील जोड रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करणे.
​”नागरिकांचा जीव धोक्यात घालून महामार्गाचे प्रशासन चालणार नाही. बेन्नितुरा पुलाचे काम आणि इतर सर्व्हिस रोडची कामे युद्धपातळीवर पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.”
— प्रविण स्वामी, आमदार.
​या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आमदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता तरी महामार्ग प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india