Best News Portal Development Company In India

धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी गजाआड ; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त !

धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी गजाआड ; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त !
तुळजापूर प्रतिनिधी ;-
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पवनचक्की केंद्रांना लक्ष्य करणाऱ्या एका सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीच्या अटकेमुळे दरोडा आणि चोरीचे तब्बल ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
७ एप्रिल २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेगव्हाण शिवारात एका पवनचक्की केंद्रावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी तेथील दोन सुरक्षारक्षकांना दोरीने बांधून बेदम मारहाण केली आणि ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व त्यांच्या पथकाला १६ एप्रिल २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार ढोकी-कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून ५ संशयितांना ३ वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता, त्यांनी मेंढा, उमरेगव्हाण, चिकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी आणि वाशी शिवारात चोऱ्या केल्याची कबुली दिली.
जप्त केलेला मुद्देमाल आणि अटक आरोपी
पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
वाहने-२ महिंद्रा स्कॉर्पियो आणि १ बोलेरो गाडी.
साहित्य: तांब्याच्या तारा आणि रोख रक्कम (एकूण किंमत ४२,००,००० रुपये).
अटक करण्यात आलेल्यांची नावे:
१) सुनील कालिदार शिंदे (रा. ढोकी)
२) लखन बापू पवार (रा. उपळा)
३) सिद्राम पोपट पवार (रा. वरूडा)
४) उद्धव बापू शिंदे (रा. बावी)
५) विक्रम लक्ष्मण पवार (रा. खामकरवाडी)
या टोळीतील इतर काही साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, गणेश पाटील, पोउपनि शिवाजी भुतेकर आणि त्यांच्या पथकाने केली आहे . सदरील कारवाईमुळे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा कडक
कारवायांमुळेच स्थानिक गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india