वाढदिवसाचा झगमगाट टाळून नगरसेवक पप्पू सावंत यांचा ‘सेवा यज्ञ’; पांजरपोळमधील गोवंशासाठी २ टन चारा भेट
अविनाश जोशी | करमाळा : राजकारणात वाढदिवस म्हणजे शक्तीप्रदर्शन, बॅनरबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी असे समीकरण रूढ झाले असताना, करमाळा शहराचे लोकप्रिय नगरसेवक माननीय श्री. संजय (पप्पू) सावंत यांनी मात्र आपल्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. कोणताही डामडौल न करता, अत्यंत साधेपणाने आणि मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
या वाढदिवसाचे मुख्य आकर्षण ठरले ते श्री गोरक्षण पांजरपोळ संस्था, करमाळा येथील गोसेवा. पप्पू सावंत यांच्या वतीने या पांजरपोळमधील गायींना तब्बल २ टन हिरवा चारा देण्यात आला. केवळ हार-तुरे स्वीकारण्यापेक्षा समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या या निर्णयाचे शहरभर कौतुक होत आहे.
याप्रसंगी करमाळा शहरातील विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवर, आजी-माजी नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या उपक्रमाचे स्वागत करत, “वाढदिवस असावा तर असा,” अशा शब्दांत सावंत यांच्या कार्याचा गौरव केला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून अनेक नेत्यांनी त्यांच्या या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या शेवटी, पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष श्री. भरत कुमार गांधी यांनी पप्पू सावंत यांचे आभार मानले. “अशा मदतीमुळे सामाजिक संस्थांना मोठे बळ मिळते,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी सावंत यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या एका लोकप्रतिनिधीचा हा ‘सेवा वसा’ करमाळा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.






