मोठी कारवाई- शिराढोणमधील दुकान फोडणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ; मुद्देमालासह आरोपी जेरबंद !
तुळजापूर प्रतिनिधी : स्थानिक पोलीस गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई भुरट्या चोरांना धडा शिकवत शिराढोण येथील एका दुकानातून मोठ्या प्रमाणात कॉपर वायरची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो जीप आणि चोरीचा माल असा एकूण ३,७०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्राप्त झालेल्या माहितीनुसार ,
दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना, सपोनि अमोल मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. शिराढोण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील (गुरनं १३/२०२६) आरोपी धनाजी बाबुराव पवार हा चोरीचा माल विकण्यासाठी वाशी फाटा येथे थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली
मिळालेल्या माहितीवरून पथकाने वाशी फाटा येथे सापळा रचून धनाजी पवार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या आरोपीची सखोल चौकशी केली असता, त्याने आपला साथीदार शिवाजी सर्जेराव काळे याच्या मदतीने शिराढोण येथील दुकानाचे कुलूप तोडून २०० ते २५० किलो कॉपर वायर चोरल्याची कबुली दिली. चोरीसाठी त्यांनी एमएच १४ सीएक्स २३७७ या क्रमांकाच्या टाटा सुमो गाडीचा वापर केला होता.
जप्त केलेला मुद्देमाल:
१७ किलो कॉपर वायर
टाटा सुमो जीप (MH 14 CX 2377)
एकूण किंमत: ₹ ३,७०,४००/- पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा काही भाग जप्त केला असून, या प्रकरणातील दुसरा आरोपी शिवाजी काळे याचा शोध सुरू आहे. या टोळीने अन्य काही ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, अमोल चव्हाण, बळीराम शिंदे, अमोल निंबाळकर, राहुल नाईकवाडी, शोभा बांगर आणि विनायक दहिहंडे यांच्या पथकाने केली आहे.
अशा धाडसी कारवायांसाठी स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव ही प्रचलित असून सदरील घटनेमुळे नागरिकांतून त्यांचे कौतुक होत आहे.





