धक्कादायक! उमरगा परिसरात पवनचक्की प्रकल्पाला चोरट्यांचा सुरुंग; १४ लाखांची केबल लंपास !
तुळजापूर (प्रतिनिधी):-
भुरट्या चोरांची मजल आता लाखो रुपयांचा मुद्देमाललंपास करण्यापर्यंत पोहचली .तालुक्यातील नारंगवाडी शिवारामध्ये असलेल्या ‘जेएसडब्ल्यू’ (JSW) पवनचक्की वीज निर्मिती प्रकल्पातून लाखो रुपयांच्या केबलची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ लाख ७१ हजार ०२४ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारंगवाडी शिवारातील झिरो पॉईंट येथे जेएसडब्ल्यू पवनचक्की प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी आलेले २४२१३२१, २४२१३२६, २४२१३२७ आणि २४२१३२९ या नंबरचे चार ‘नेसल’ (Nacelle) सुरक्षित ठेवण्यात आले होते.
दिनांक ०८ जानेवारी २०२६ ते ११ मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून या चारही नेसलमधील महागड्या केबल वायर कापून चोरून नेल्या. प्रकल्पाच्या ठिकाणी तपासणी केली असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या मोठ्या चोरीप्रकरणी प्रकल्पाचे प्रतिनिधी शाम शेळके यांनी २६ एप्रिल २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ठिकाण: नारंगवाडी शिवार (झिरो पॉईंट), उमरगा.
चोरी झालेला माल: पवनचक्की नेसलमधील केबल वायर.
एकूण किंमत: ₹ १४,७१,०२४/-
तपास अधिकारी: उमरगा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
उमरगा परिसरात या चोरीमुळे खळबळ उडाली असून, औद्योगिक साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे . कुठेही संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांशी संपर्क साधावा.







