कोलंबो येथे भारताचा झेंडा उंचावला – वागदरीची लेक श्रद्धा चव्हाणची दमदार कामगिरी
———————
वागदरी(एस.के.गायकवाड .) :- तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील कन्या श्रद्धा बालाजीसिंग चव्हाण हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे. महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या वतीने 24 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित करण्यात आलेल्या साउथ एशियन अंडर-17 बॉईज अँड गर्ल्स गोल शॉट बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले, आणि या यशात श्रद्धाचा मोलाचा वाटा ठरला.
स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने मालदीव, भूतान आणि नेपाळ या संघांवर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भारताने यजमान श्रीलंका संघाचा 15-4 अशा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद आपल्या नावावर केले.
या अंतिम सामन्यात श्रद्धा चव्हाण हिने एकट्याने 15 पैकी तब्बल 6 गोल करत आपली खेळातील ताकद आणि कौशल्य सिद्ध केले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाला भक्कम आघाडी मिळाली आणि विजयाचा मार्ग सुकर झाला.
श्रद्धा ही सध्या सोलापूर येथे पोलीस सेवेत कार्यरत असलेले बालाजीसिंग चव्हाण यांची कन्या आहे. वागदरी गावातील सामान्य कुटुंबातून आलेल्या श्रद्धाने आपल्या जिद्द, मेहनत आणि क्रीडाप्रेमाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे.
तिच्या या यशामुळे वागदरीसह तुळजापूर तालुका आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. गावकऱ्यांकडून तिचे कौतुक होत असून, अनेकांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत देशाला विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रद्धा चव्हाण हिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, तिच्या या यशामुळे भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.






