तुळजापुरात भाविकाच्या दागिन्यांवर डल्ला; गर्दीचा फायदा घेत साडेचौदा ग्रॅमचे मिनीगंठन लंपास!
तुळजापूर | प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी दर्शनास येणाऱ्या भाविकांच्यादागिन्यांकडे आता चोरट्याने मोर्चा वळवलेला दिसतोय .आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दागिन्यांवर सराईत चोरट्यांनी डल्ला मारला आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातील ‘आरती पॉईंट’ येथे गर्दीचा फायदा घेऊन एका महिला भाविकाच्या गळ्यातील १४.५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठन अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिक्षा प्रशांत पौळ (वय २६ वर्ष, रा. शेटफळ नागोबाचे, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दि. १ मे २०२६ रोजी आपल्या नातेवाईकांसह तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दुपारी १:१० वाजेच्या सुमारास त्या मंदिर परिसरातील आरती पॉईंटजवळ असताना, अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे ४३,५०० रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठन हातोहात लंपास केले.
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच प्रतिक्षा पौळ यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दाखल गुन्हा: भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२)
तुळजापूर पोलीस मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची चौकशी करत असून अधिक तपास सुरू आहे.
भाविकांना आवाहन – मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने भाविकांनी आपल्या दागदागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भाविकांनी तसेच मंदिर प्रशासनाने आणि पोलिसांनी सजग आणि सतर्क राहण्याची गरज आहे.






