रस्त्यालगत निष्काळजीपणे शेगडी पेटवणे भोवले; ताकविकी पाटी येथील दोघांवर गुन्हे दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :- एक तर सगळीकडे गॅस टंचाई असताना हे नवे कांड समोर आले . या कारवाईने व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलित करणाऱ्यांविरुद्ध बेंबळी पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. ताकविकी पाटी परिसरात रस्त्यालगत गॅस शेगडीवर निष्काळजीपणे व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.व्यवसायिक निष्काळाजीपणा समोर आला.
दिनांक ३ मे २०२६ रोजी ताकविकी पाटी येथून तोरंब्याकडे जाणाऱ्या रोडवर ही कारवाई करण्यात आली. येथील ‘एचपी चिकन सेंटर’ नावाच्या पत्र्याच्या शेडमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी हातगाड्यांवर गॅस शेगडी पेटवून व्यवसाय सुरू होता. ही ठिकाणे मुख्य रस्त्याला लागून असल्याने आणि तेथे अग्नीचा वापर अत्यंत निष्काळजीपणे होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी खालील दोन जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
१. नबीलाल मुक्तार शेख (वय २७ वर्ष, रा. तोरंबा, ता. जि. धाराशिव)
२. सलीम खाजा सय्यद (वय २६ वर्ष, रा. ताकविकी, ता. जि. धाराशिव)
सार्वजनिक ठिकाणी मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने अग्नीचा वापर केल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७ अन्वये उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
या कारवाईने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यालगत व्यवसाय करताना सुरक्षिततेची काळजी घेणे अनिवार्य आहे. निष्काळजीपणे आग पेटवून लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल. घरगुती वापराचा गॅस व्यवसायासाठी वापरणे कायद्याने गुन्हा आहे. आणि व्यावसायिक सिलेंडर वापरताना योग्य ती काळजी घेणे आणि स्वतःच्या व इतरांच्या ही जीवितास धोका होणार नाही असा वापर करणे अनिवार्य आहे.






