मोठी कारवाई! ढोकी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश; एकाला बेड्या, ३९ हजारांची रोकडसह सोन्याचे दागिने जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी:-भुरट्या चोरांची मजा वाढली पहिले पाकीट मारी आता मोठमोठ्या घरफोड्या. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या अटकेमुळे ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विलास हजारे यांना माहिती मिळाली की, पोलीस ठाणे ढोकी येथील गु.र. नं. १४३/२०२६ (कलम ३०५(a) BNS) मधील अज्ञात आरोपी हे कोंड आणि सुंभा परिसरात फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून परिसराची नाकेबंदी केली.
पोलिसांना पाहताच दोन आरोपी फरार
पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत असताना, आरोपींनी पोलिसांना पाहताच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी पाठलाग करून विकी सजगिया शिंदे याला ताब्यात घेतले. मात्र, त्याचे इतर दोन साथीदार (कृष्णा श्रावण शिंदे आणि अजय श्रावण शिंदे) पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
मुद्देमाल जप्त आणि गुन्हेगारांनी गुन्ह्यांची कबुली
अटक करण्यात आलेल्या विकी शिंदे याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३९,००० रुपये रोख
२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ४ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सपोनि विलास हजारे, पोउपनि माळी, ग्रेड पोउपनि सातपुते, पोलीस हवालदार बागवान, मपोना रोकडे, पोलीस अंमलदार महेश शिंदे, नवनाथ खांडेकर आणि लक्ष्मण शिंदे यांचा समावेश होता. पसार झालेल्या इतर दोन आरोपींचा शोध पोलीस प्रशासन युद्धपातळीवर घेत आहे. सदर कारवाईमुळे भुरट्या चोरांचे धावबेदनानले असून ढोकी पोलिसांची विश्वासार्हता वाढलेली आहे. त्यांच्या या कारवाईमुळे जनसामान्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.







