Best News Portal Development Company In India

सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानाची साधना कायम; सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कमलाकर मोटे यांना पी‌एच. डी. पदवी प्रदान!

सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानाची साधना कायम; सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कमलाकर मोटे यांना पी‌एच. डी. पदवी प्रदान
​ तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
(दि.१४ )जिद्द आणि चिकाटी असेल तर वयाची कोणतीही अट ज्ञानाच्या आड येत नाही, याचाच प्रत्यय मुरुम येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कमलाकर मोटे यांनी दिला आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून इतिहास विषयात विद्यावाचस्पती (पी‌एच.डी.) पदवी संपादन केली असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ​कमलाकर मोटे यांनी उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्रो. डॉ. भिम माने यांच्या मार्गदर्शनाखाली आपला शोधप्रबंध पूर्ण केला. त्यांच्या संशोधनाचा विषय ” लातूर शहराचा सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहास : एक चिकित्सक अभ्यास ” हा होता. अत्यंत सखोल आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने त्यांनी लातूर शहराच्या ऐतिहासिक जडणघडणीचा मागोवा या प्रबंधातून घेतला आहे. नुकतीच त्यांची ऑनलाइन मौखिक परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली. कमलाकर मोटे यांनी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत केंद्रप्रमुख म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय अनेक सामाजिक संस्थांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. निवृत्तीनंतर विश्रांती न घेता त्यांनी संशोधनाचे क्षेत्र निवडले आणि त्यात यश संपादन करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही मोटे यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय रोटरी क्लब, मुरुम सिटीचे अध्यक्षपद भूषवले असून, सामाजिक चळवळीत ते सदैव सक्रिय असतात. विशेष म्हणजे, त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या यशाबद्दल उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, प्रो. डॉ. ओमप्रकाश लिगाडे, प्रो. डॉ. शिवपुत्र कनाडे, अर्जुन धुळेकर (लातूर), प्रो. डॉ. भूषण फडतरे (पुणे), सुरेश (बापू) साळुंके, पत्रकार गुणवंत जाधवर, प्रो. डॉ. त्र्यंबक पाटील, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रो. डॉ. व्यंकटेश लांब, बीड येथील प्रा. डॉ. ओमप्रकाश चिलगर, लक्ष्मीकांत पटणे, सोलापूरचे डॉ. प्रभाकर कोळेकर आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ​निवृत्तीनंतरच्या या शैक्षणिक यशाचे मुरुम शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील कमलाकर मोटे यांना पीएच. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. ओमप्रकाश चिलगर यांच्या हस्ते सत्कार करताना लक्ष्मीकांत पटणे, अर्जुन धुळेकर, उषा गंगथडे आदी.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india