उमरग्याची लेक बबिता राठोड ‘वुमन एक्झेंपलार प्रोग्राम २०२६’ च्या अंतिम फेरीत!
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील वंचित घटकातील महिला आणि मुलींच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या बबिता राठोड यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘वुमन एक्झेंपलार प्रोग्राम दि.१२.५ २०२६’ (Woman Exemplar Program 2026) च्या आरोग्य (Health) गटात अंतिम उपविजेत्या (Finalist) म्हणून निवड झाली आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (CII) कडून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची घोषणा करण्यात आली असून, यामुळे उमरगा तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.बबिता राठोड यांनी तळागाळातील महिलांचे आरोग्य आणि त्यांचे सक्षमीकरण या क्षेत्रांत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या याच नेतृत्वाची आणि तळमळीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ‘सीआयआय वार्षिक बिझनेस समिट २०२६’ (CII Annual Business Summit 2026) मध्ये देशातील अशाच २० प्रेरणादायी महिला नेत्यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय श्री. धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘सीआयआय फाउंडेशन’चा हा उपक्रम दरवर्षी अशा ग्रामीण महिलांचा शोध घेतो, ज्यांनी संकटांवर मात करून समाजात मोठा बदल घडवून आणला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी देशभरातील सुमारे २० लाख लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे.
या निवडीमुळे बबिता राठोड यांना पुढील वर्षभरात ‘वुमन एक्झेंपलार प्रोग्राम’अंतर्गत विशेष नेतृत्व विकास प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि त्यांच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच त्या ‘सीआयआय वुमन एक्झेंपलार नेटवर्क’चा भाग बनून देशभरातील इतर महिला नेत्यांसोबत काम करू शकतील.
बबिता राठोड यांच्या या यशाबद्दल उमरगा आणि संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







