*उमरगा शहरात डुकरांचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण, दुर्गंधीयुक्त पाणी आणि अस्वच्छता..*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
आज उमरगा शहरातील विविध भागांतून काढलेले हे फोटो आहेत. फोटोवरील लोकेशन आणि वेळ स्पष्ट दिसत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात, रस्त्यांच्या कडेला, नाल्यांमध्ये, मोकळ्या जागांमध्ये आणि वस्तीशेजारी अक्षरशः डुकरांचे साम्राज्य निर्माण झालेले दिसते. सर्वत्र कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण, दुर्गंधीयुक्त पाणी आणि अस्वच्छता पसरलेली आहे.
ही परिस्थिती केवळ विद्रूप नाही, तर गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, त्वचारोग, संसर्गजन्य आजार यांना अशी घाण थेट आमंत्रण देत असते. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उमरगा हे आपल्या तालुक्याचे आणि संपूर्ण मतदारसंघाचे मुख्य शहर आहे. त्यामुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. याबाबत मा. आमदार, नगराध्यक्ष, संबंधित नगरसेवक, नगर परिषद मुख्याधिकारी, स्वच्छता विभाग यांनी तात्काळ लक्ष घालणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, डुकरांच्या बंदोबस्ताची प्रभावी उपाययोजना आणि नाल्यांची साफसफाई तातडीने झाली पाहिजे.
नागरिकांनीदेखील उघड्यावर कचरा टाकणे थांबवले पाहिजे. घरगुती व व्यावसायिक कचरा योग्य पद्धतीने देणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि नगर परिषदेला सहकार्य करणे हीदेखील प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.
आपल्या शहराची अवस्था पाहून बाहेरचा माणूस उमरग्याबद्दल मत बनवत असतो. म्हणूनच “माझे शहर, माझी जबाबदारी” ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे.
उमरगा स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी प्रशासन आणि नागरिक या दोघांनीही आता गंभीरपणे पुढे येण्याची गरज आहे.
© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)








