तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील थरार; एकाचा मृत्यू ,भांडण सोडवायला गेलेला मुलगाही गंभीर जखमी, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी:-“सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी” कार्ला गावासह परिसरात हळहळ व्यक्त.
तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. सामाईक बोरवेलमधील मोटार आपल्याला न विचारता का काढली, असा जाब विचारल्याच्या कारणावरून सख्ख्या भावांनी आपल्या मुलांच्या मदतीने एका ५५ वर्षीय व्यक्तीची लोखंडी पाईप, काठी आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. या जीवघेण्या हल्ल्यात मयताचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दि. २१ मे २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाण्यातून वाद आणि जीवघेणा हल्ला.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्ला येथील रहिवासी ब्रम्हदेव बब्रुवान मोटे (वय ५५ वर्षे) यांनी सामाईक बोरमधील मोटार काढली होती. याच कारणाचा राग मनात धरून आरोपी विष्णू बब्रुवान मोटे, गौतम बब्रुवान मोटे, योगेश गौतम मोटे आणि मनोज गौतम मोटे (सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर) यांनी ब्रम्हदेव यांना “आम्हाला न विचारता मोटार का काढली?” असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर काही वेळातच अत्यंत हिंसक झाले. आरोपींनी एकत्र येत ब्रम्हदेव मोटे यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईप, काठी आणि धारदार कोयत्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने ब्रम्हदेव मोटे यांचा मृत्यू झाला. वडिलांना वाचवायला गेलेल्या मुलावरही कोयत्याने वार करण्यात आले.
हा थरार सुरू असताना ब्रम्हदेव यांचा मुलगा महेश ब्रम्हदेव मोटे (वय २५ वर्षे) हा आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी धावून गेला. मात्र, नराधम आरोपींनी त्यालाही सोडले नाही. महेश याला जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात महेश गंभीररित्या जखमी झाला आहे.
याप्रकरणी गंभीर जखमी झालेला मुलगा महेश मोटे याने दि. २२ मे २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद (प्रथम खबरी अहवाल) दिली. महेशच्या जबाबावरून नळदुर्ग पोलिसांनी आरोपी विष्णू मोटे, गौतम मोटे, योगेश मोटे आणि मनोज मोटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), १०९, ११५(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे कार्ला परिसरात आणि संपूर्ण तुळजापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सत्र घटनेने तालुक्यात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.






