धक्कादायक! ‘कायमस्वरूपी काम देतो’ म्हणून २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :- भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन आपल्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत त्यातच नळदुर्गच्या या घटनेने परिसरात महिलांन साठी भीतीदायक आणि अविश्वासनीय घटना घडली आहे.’तुला कायमस्वरूपी काम देतो’ असे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात नराधम तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय तरुणी (नाव-गाव गोपनीय) ही दि. ३१ मे २०२६ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास आपल्या गावात होती. याच दरम्यान, परिसरातील एका आरोपी तरुणाने तिला गाठले. “तुला कायमस्वरूपी काम देतो,” असे खोटे आश्वासन देत त्याने तरुणीला विश्वासात घेतले आणि स्वतःच्या मोटरसायकलवर बसवले.
आरोपीने तरुणीला एका गावातील मोकळ्या पटांगणात, जेथे पूर्णपणे अंधार होता, तिथे नेले. तिथे त्याने तरुणीला जीवे मारण्याची किंवा गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर नराधमाने, “याबाबत कोणाला काही सांगू नको, मी तुला कायमस्वरूपी सांभाळतो,” असे म्हणत तिला पुन्हा मोटरसायकलवर बसवून रस्त्यावर आणून सोडले आणि तिथून पळ काढला.
या धक्कादायक प्रसंगानंतर भयभीत झालेल्या पीडित तरुणीने शेवटी हिंमत एकवटून पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. पीडितेने दि. २ जून २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (बलात्कार) आणि कलम ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नराधमास कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी होत आहे. पोलीस प्रशासन आता या घटनेला किती गांभीर्याने घेऊन त्या पिडीत तरुणीस न्याय मिळवून देते ? याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.






