परंड्यात संतापजनक प्रकार: तीन नराधमांकडून २४ वर्षीय तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार; छायाचित्रीकरण करून दिली धमकी!
तुळजापूर प्रतिनिधी :-परंडा तालुक्यात समाजाला कलंकित करणारी घटना घडली. तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन आणि धमकी देऊन तीन वेगवेगळ्या तरुणांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बळजबरी, ब्लॅकमेलिंग आणि अत्याचार
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय तरुणी (नाव, गाव गोपनीय) ही दि. २५ मे २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास घरी एकटीच होती. यावेळी गावातील एका तरुणाने मोबाईल चार्जिंगला लावण्याच्या बहाण्याने तिच्या घरात प्रवेश केला. त्याने तरुणीला मॅंगो ज्यूस पिण्यास दिला. या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध असल्याने ज्यूस प्यायल्यानंतर तरुणीला तीव्र झोप लागली. याचा गैरफायदा घेत संशयित आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर त्याने या कृत्याचे मोबाईलवर छायाचित्रीकरण (व्हिडिओ) केले. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर, “हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन,” अशी धमकी त्याने दिली.
या घटनेनंतर दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास तरुणी घरी असताना, गावातीलच दुसऱ्या एका तरुणाने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
हे सत्र एवढ्यावर थांबले नाही, तर दि. ३ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास गावातील तिसऱ्या एका तरुणाने पीडित तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
भारतीय न्याय संहितेसह ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल.
सततच्या या छळाला आणि अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित तरुणीने हिंमत दाखवत दि. ५ जून २०२६ रोजी परंडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) परंडा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे: ६४(१), ६४(२) (बलात्कार आणि सामूहिक अत्याचार), ७७ (स्त्रीच्या संमतीविना तिचे चित्रीकरण किंवा कृत्य करणे), १२३ (गुंगीचे औषध देणे), ३३३ (जबरदस्तीने घरात घुसणे), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी देणे).
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (Atrocities Act) कलम ३(२)(V-A).
या अत्यंत गंभीर गुन्ह्याची नोंद होताच परंडा पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली असून, आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
महिलांवरील अत्याचाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाही.
वरील घटनेचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करावी आणि पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी समाजातून मागणी होत आहे. तसेच संतप्त प्रतिक्रिया मिळत आहेत.







