धाराशिवमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: सोलर आणि पवनचक्की प्रकल्पाचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड, १० गुन्हे उघड!
तुळजापूर प्रतिनिधी :- बरेच दिवस धाराशिव जिल्ह्यात या चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातलेला होता.जिल्ह्यातील विविध भागांत असलेल्या सोलर प्लांट आणि पवनचक्की प्रकल्पांमधून महागड्या तांब्याच्या तारा व केबल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २ आरोपींना (ज्यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे) अटक केली असून, त्यांच्याकडून ६,४२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे जिल्ह्यातील तब्बल १० चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
माहिती अधिकार्यांचे आदेश आणि कारवाई
धाराशिव जिल्ह्यातील सोलर प्लांट आणि पवनचक्की प्रकल्पांमधून साहित्य आणि वायर चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. हे गुन्हे अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असल्याने धाराशिवच्या पोलीस अधीक्षक मा. श्रीमती रितू खोखर यांनी हे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि विनोद इज्जपवार यांना दिले होते.
७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने येडशी (ता. जि. धाराशिव) येथून टाटा सुमो वाहनासह २ संशयित इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांनी खालील भागांतील सोलर व पवनचक्की प्लांट लक्ष्य केले होते.
तेरखेडा, रुईभर, कौडगाव, ढोकी (ता. धाराशिव)
साबळेवाडी, आरसोली (ता. भूम)गौरगाव, मस्सा (ता. कळंब).
या सर्व भागांतील शिवारातून त्यांनी तांब्याच्या तारा असलेल्या महागड्या केबल्स चोरल्याचे मान्य केले.
१९५ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो गाडी, एकूण किंमत ₹६,४२,४००/-रुपये.
अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव शिवाजी उर्फ नाना संजय काळे (रा. खामकर पारधी पेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) असे असून, त्याच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक (नाबालिक) आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री. विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, पोकॉ १०२९ कोळी, चापोह रत्नदिप डोंगरे आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील सोलर व पवनचक्की प्रकल्प चालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तरी अशा चोऱ्या पुन्हा होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेणे तथा अनुचित प्रकार दिसतात पोलिसाचे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.






