“माझा संसार का मोडलास?” जावयाने सासूच्या डोक्यात दगड घालून केला जीवघेणा हल्ला; लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील धक्कादायक घटना!
तुळजापूर प्रतिनिधी:- धोंड्याच्या महिन्यात जावयाने घातला सासूच्या डोक्यात धोंडा “माझा संसार का मोडलास? माझी बायको कोठे आहे? तू मेल्याशिवाय माझी बायको मला मिळत नाही,” असा जाब विचारत एका जावयाने आपल्या ५० वर्षीय सासूवर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथे घडली आहे. या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाली असून, लोहारा पोलीस ठाण्यात आरोपी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुर्शदपूर (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथील रहिवासी असलेल्या सुनिता मारुती खरोसे (वय ५० वर्षे) यांचा जावई नितीन अशोक सुरवसे याने मंगळवारी (दि. ०९.०६.२०२६) दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास मुर्शदपूर येथील सासूच्या घरी गेला. तेथे त्याने कौटुंबिक वादातून आणि पत्नी माहेरी असल्याच्या रागातून सासू सुनिता खरोसे यांना गाठले.
”तू माझा संसार मोडलास” असा आरोप करत, जावयाने “तू मेल्याशिवाय माझी बायको मला मिळणार नाही” असे म्हणून सासूला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगडाने प्रहार केला. या भीषण हल्ल्यात सुनिता खरोसे या गंभीररित्या जखमी झाल्या.
या घटनेनंतर जखमी सुनिता खरोसे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि. १०.०६.२०२६) त्यांनी रुग्णालयात दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून लोहारा पोलीस ठाण्यात आरोपी जावई नितीन सुरवसे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लोहारा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नितीन अशोक सुरवसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) (जिवे मारण्याचा प्रयत्न), ११५(२), ३५१(२), आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






