Best News Portal Development Company In India

उमरगा शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर – नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी!

उमरगा शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर
—————–
नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी
—————–
उमरगा, प्रतिनिधी : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना उमरगा शहरातील अनेक भागांमध्ये नालेसफाईची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक कचरा आणि झुडपे साचल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे वेळेत नालेसफाई पूर्ण करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांत मुसळधार पावसामुळे मात्रे नाला बाजूच्या घराना, आरोग्य नगरी, नविन आरोग्य नगरी, एकोंडी रोड, मुन्शी प्लॉट, दत्त मंदिर, महादेव मंदिराच्या पाठी मागील काही भागांत पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरातील प्रमुख नाले, गटारी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी साफसफाईची कामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष मोहीम राबवून नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण केल्यास संभाव्य पाणी तुंबण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सर्व नाल्यांमधील गाळ व कचरा काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे आवश्यक आहे. विशेषतः शहरातील सखल भागांमध्ये विशेष उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू असल्याची माहिती मिळत असली तरी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
————
मान्सूनपूर्व तयारी खूप दिवसापासून सुरू आहे त्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर, अतिरिक्त मजूर रोजंदारी वर घेतले आहेत. जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम तात्काळ करून घेण्यात येईल
—- किरण गायकवाड, नगराध्यक्ष, न प उमरगा
————————-
गेल्या अनेक वर्षांपासून दररोज आमच्या घरासमोरची गटार तुंबून घाण पाणी सर्व घरात घुसत आहे, माझ्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आलं आहे याला जबाबदार नगर परिषद आहे
—- दादाराव भोसले, कुंभार प्लॉट उमरगा

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india