श्री तुळजाभवानी मंदिरात नवीन दर्शन व्यवस्था लागू ; देणगी दर्शन पूर्वीप्रमाणेच जलदगतीने!
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगत जननी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शन व्यवस्थेत आजपासून महत्वपूर्ण बदल करण्यात आला असून, सर्व भाविकांना देवीचे दर्शन समान अंतरावरून आणि अधिक सुलभ पद्धतीने घेता यावे, या उद्देशाने दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी ५०० रुपये देणगी दर्शन पास रांग आणि २०० रुपये देणगी दर्शन पास रांग अनुक्रमे मंदिर परिसरात फिरून न्हाणी गेट मार्गे तसेच छत्रपती संभाजी महाराज प्रांगणातून जात होती. या मार्गांवर भाविकांसाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देताना काही मर्यादा येत होत्या.
नवीन दर्शन व्यवस्थेनुसार ५०० रुपये व २०० रुपये देणगी दर्शनाच्या रांगा आता दर्शन मंडपातून जाणार आहेत. त्यामुळे या रांगांमधून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, कुलर, स्वच्छतागृह तसेच स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
दरम्यान, नवीन व्यवस्थेमुळे देणगी दर्शनाच्या वेळेवर कोणताही परिणाम होत नसून, ५०० रुपये व २०० रुपये देणगी दर्शन रांगांमधून भाविकांना पूर्वीप्रमाणेच कमी वेळेत आणि जलदगतीने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेता येणार आहे. तरी श्री तुळजाभवानीच्या जगभरातून येणाऱ्या भाविक भक्तांनी देवीच्या दर्शन रांगेतील आमुलाग्र बदल लक्षात घ्यावे. आणि मंदिर संस्थांनाला सहकार्य करावे जेणेकरून कुठल्याही भाविक भक्ताला त्रास न होता सर्वांचे व्यवस्थित आणि सुरळीत श्री आई तुळजाभवानीचे दर्शन होईल.






