उमरगा: ग्रामविकास प्रशिक्षण कार्यशाळेत लोकप्रतिनिधींनी घेतली ‘व्यसनमुक्तीची’ शपथ!
एस के गायकवाड ;- अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताहानिमित्त मारुती बनसोडे यांचे प्रबोधन ११६ हून अधिक जणांची उपस्थिती.
तालुक्यातील ग्रामविकासाला गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत आज एक आगळावेगळा संकल्प करण्यात आला. येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित ‘ग्रामविकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेत’ (GPDP) तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ देण्यात आली.
अमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त विशेष पाऊल सध्या सुरू असलेल्या ‘अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताहा’चे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त श्री. मारुती बनसोडे यांनी उपस्थित सर्वांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल सविस्तर माहिती दिली. गावपातळीवर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गाव व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करत त्यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती या महत्त्वपूर्ण प्रसंगी पंचायत समिती उमरगाचे विस्तार अधिकारी संजय राऊत, विस्तार अधिकारी के.बी. भांगे आणि किशोर औरादे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवीण प्रशिक्षक सत्यवती इंगळे व संगीता राऊत यांचीही उपस्थिती होती.
महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यशाळेला आणि शपथविधीला तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये ११८ पुरुष आणि १८ महिला अशा एकूण १३६ जणांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या गावांना व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला. ग्रामविकासाच्या प्रशिक्षणासोबतच सामाजिक भान जपणारा हा उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.






