सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सोन्याच्या चोरीचा छडा; तुळजापूर पोलिसांची धडक कामगिरी, बारामतीच्या भाविकाला ४ तोळे सोने परत!
तुळजापूर प्रतिनिधी :-तुळजापूर पोलिसांच्या कार्यात मानाचा तुरा अथक प्रयत्न करून चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न.
गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी चिकाटी, संयम आणि तांत्रिक कौशल्याची जोड दिली तर कितीही कठीण गुन्हा उघडकीस आणता येतो, याचे उत्तम उदाहरण तुळजापूर पोलिसांनी दाखवून दिले आहे. तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बालाजी कामतकर यांनी कौतुकास्पद कामगिरी करत, तुळजाभवानी मंदिराबाहेरून चोरीला गेलेले बारामतीच्या एका भाविकाचे ४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या धडक कारवाईमुळे तुळजापूर पोलिसांनी भाविकांचा विश्वास जिंकला आहे.
जानेवारी महिन्यात तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी बारामती येथील एक भाविक आले होते. मंदिर परिसराबाहेरून त्यांचे ४ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बालाजी कामतकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचा दुवा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हवालदार कामतकर यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तासनतास बारकाईने निरीक्षण केले. फुटेज तपासत असताना संशयिताच्या हालचालींवरून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. या तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित झाली आणि पोलिसांचा संशयितापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला.
सोलापूर येथून आरोपीला अटक
तांत्रिक तपासासोबतच गोपनीय माहिती गोळा करण्यात आली. यादरम्यान संशयित आरोपी सोलापूर परिसरातील असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार बालाजी कामतकर यांनी तातडीने सोलापूर गाठून अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सापळा रचला आणि रोहित पंडित हातोरी (रा. सेटलमेंट चौक, सोलापूर) याला ताब्यात घेतले.
४ तोळे सोने हस्तगत; भाविकाने मानले आभार
पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले सुमारे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आपले मौल्यवान दागिने परत मिळाल्यामुळे संबंधित भाविकाने समाधान व्यक्त करत तुळजापूर पोलिसांचे आभार मानले आहेत.
”विविध राज्यांतून येणारे लाखो भाविक आणि अत्यंत मर्यादित धागेदोरे अशा आव्हानात्मक परिस्थितीतही हवालदार कामतकर यांनी हार न मानता तपास सुरू ठेवला. त्यांच्या चिकाटीमुळेच हा गुन्हा उघडकीस आला आहे.”
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बालाजी कामतकर यांनी केलेली ही कामगिरी तुळजापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेची आणि कर्तव्यदक्षतेची प्रचिती देणारी ठरली असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.






