तुळजापूर- सांगलीच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला १३४३ ग्रॅम चांदीचा पाळणा अर्पण!
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी देशभरातून अनेक भाविक विविध वस्तू आणि नवस अर्पण करत असतात. आई कुलस्वामिनी आणि तिचे भक्त यांचे अतूट नाते आहे. आज अशाच एका मनोभावे केलेल्या दानाने तुळजापूर नगरीत भक्तीचा पूर आला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी येथील रहिवासी आणि देवीचे परम भक्त श्री. प्रकाश भानुदास सुर्यवंशी यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी १३४३ ग्रॅम (सुमारे सव्वा किलो) वजनाचा चांदीचा देखणा पाळणा अर्पण केला आहे.
दर्शनानंतर भक्तिभावाने सुपूर्द केली भेट
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सुर्यवंशी हे आज सकाळी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. मुख्य गाभाऱ्यात देवीचे अत्यंत मनोभावे दर्शन घेतल्यानंतर, त्यांनी आपल्या कडील १३४३ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा देवीच्या चरणी अर्पण केला. हा पाळणा अत्यंत आकर्षक आणि कलाकुसर केलेला आहे.
”देवीच्या दर्शनाने मनाला मिळणारे समाधान आणि तिची कृपा शब्दात सांगता येत नाही. ही चांदीची वस्तू तिच्याच चरणी अर्पण करताना मला कमालीचा आनंद होत आहे.”हे भाविक भक्ताच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसून येत होते.
भाविकाच्या या दातृत्वाची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने प्रकाश सुर्यवंशी यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. संस्थानच्या अधिकार्यांनी त्यांना श्री तुळजाभवानी देवीची पवित्र प्रतिमा (फोटो) भेट देऊन त्यांचा गौरव केला. याप्रसंगी मंदिरातील पुजारी, मानकरी आणि अन्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







