Best News Portal Development Company In India

मुरूम शहरातील नागरिकांच्या वतीने लोकराजे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी!

मुरूम शहरातील नागरिकांच्या वतीने लोकराजे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
सामाजिक समतेचे अग्रदूत, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मुरूमकरांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण प्रसार, समता आणि बंधुतेच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

याप्रसंगी वक्त्यांनी सांगितले की, राजर्षी शाहू महाराज यांची जयंती केवळ उत्सव म्हणून न साजरी करता त्यांच्या विचारांचे आत्मपरीक्षण करणे आणि आजच्या सामाजिक परिस्थितीत त्यांच्या तत्त्वांची प्रासंगिकता समजून घेणे ही काळाची गरज आहे. महाराजांचे नाव घेणे, त्यांच्या नावाने संस्था, रस्ते किंवा चौक उभारणे यापेक्षा त्यांनी अपेक्षित केलेला समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आणि त्यासाठी कार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे.

आज काही समाजकंटकांकडून महापुरुषांच्या नावाचा वापर करून समाजात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. अशा प्रवृत्ती ओळखून त्यांना वेळीच रोखणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. लोकराजे शाहू महाराजांचा इतिहास समाजात ऐक्य, समता आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याची प्रेरणा देतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

जात-पात, भेदभाव आणि सामाजिक कटुता दूर करून प्रत्येकाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच सामाजिक ऐक्यासाठी खंबीरपणे उभे राहणे हीच शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

क्रांतीसूर्य लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरवासीयांच्या वतीने त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भगत माळी,मोहन जाधव व राजू गायकवाड यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास युवासेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद (भगत) माळी, इतिहास अभ्यासक मोहन जाधव,राजेंद्र गायकवाड, दादा बिराजदार, दिपक मुळे, संतोष जाधव , राजेंद्र घोडके, पंकज कांबळे, अमोल भालेराव, लालसिंग भोसले, दुर्गे मामा, देवानंद शिंदे, वैजीनाथ करगले, इराय्य स्वामी, अनिल चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते सिध्दलिंग अप्पा हिरेमठ उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india