Best News Portal Development Company In India

दि. २८ जून २०२६ रोजी मंदिर परिसरात घडलेल्या घटनेबाबत मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण!

दि. २८ जून २०२६ रोजी मंदिर परिसरात घडलेल्या घटनेबाबत मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण!

तुळजापूर प्रतिनिधी:- दिनांक २८ जून २०२६ रोजी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षा रक्षक व एका भाविक यांच्यामधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. या घटनेसंदर्भात वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
सदर भाविक आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी धर्मदर्शन रांगेतून दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडताना त्यांची पत्नी अद्याप आतमध्येच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा आत जाण्याची विनंती सुरक्षा निरीक्षकांकडे केली.
त्या वेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सुरक्षा निरीक्षकांनी संबंधित भाविकांना त्यांच्या पत्नी दर्शन घेऊन बाहेर येतील, असे सांगून प्रतीक्षा करण्याची विनंती केली. मात्र, भाविकांनी पुन्हा आत जाण्याचा आग्रह धरल्याने मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना आत प्रवेश देण्यात आला.
बराच वेळ उलटल्यानंतरही संबंधित भाविक एकाच ठिकाणी थांबून असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गर्दीचे नियोजन व सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तेथून बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र, त्यावेळी संबंधित भाविकांनी सुरक्षा रक्षकास धक्काबुक्की केल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला.
मंदिर प्रशासन अशा प्रकारच्या घटनांकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असून, घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात येत असून, सुरक्षा कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सर्व भाविकांना सुरक्षित, सुलभ व शांततापूर्ण दर्शन मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. भाविकांनीही मंदिर प्रशासन व सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करून मंदिर परिसरातील शिस्त व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india