उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे शीतगृह तातडीने सुरू करण्याची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस( आय)ची मागणी.
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे उभारण्यात आलेले शीतगृह (मृतदेहगृह) तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा उपजिल्हा रुग्णालयात शीतगृहाची सुविधा उपलब्ध असूनही ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघात, नैसर्गिक मृत्यू किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत नातेवाईकांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी शीतगृह लवकरात लवकर सुरू करून आवश्यक मनुष्यबळ व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. मागणीची तातडीने पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर,उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन भाऊ बिराजदार उपनगराध्यक्ष विजय भैय्या वाघमारे, सभापती विशाल काणेकर, नगरसेवक विजय दळगडे नगरसेवक बाबा मस्के, रेखा ताई सूर्यवंशी, प्रफुल्ल गायकवाड,संजय सरवदे, ॲड एस पी इनामदार,जयश्री चव्हाण मॅडम,सतीश जाधव,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागाकडे योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.








