रूई येथील किराणा दुकान फोडणारे तीन सराईत चोरटे गजाआड; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!
तुळजापूर प्रतिनिधी :- स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई. रूई (ढोकी) येथील किराणा दुकान फोडून चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना बेड्या ठोकण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार असा एकूण ६ लाख ५९ हजार ६१५ रुपयांचा ऐवज जप्त केला असून, या कारवाईमुळे दोन मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, कन्हेरवाडी पाटी येथील सुभाष भीमराव काळे याने त्याच्या साथीदारांसह दोन-चार दिवसांपूर्वी एका किराणा दुकानातून तेलाचे डबे व इतर साहित्य चोरून आणले आहे. हा सर्व माल त्याने कन्हेरवाडी पाटी येथील स्वतःच्या पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवला असून, तो सध्या त्याच्या साथीदारांसह इनोव्हा कारमधून येरमाळा येथे गेला आहे.
माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ येरमाळा येथे जाऊन सापळा रचला आणि संशयास्पद इनोव्हा कारसह तीन जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे-
१) सुभाष भीमराव काळे (वय ३४ वर्षे, रा. कन्हेरवाडी पाटी)
२) अनिल रमेश शिंदे (वय २९ वर्षे, रा. मस्सा)
३) अरुण बबन शिंदे (वय २८ वर्षे, रा. मोहा)
पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल
सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन कसून चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. रूई येथील किराणा दुकान फोडून चोरलेला माल कन्हेरवाडी पाटी येथील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी तात्काळ सांगितलेल्या ठिकाणी छापा टाकून खालील मुद्देमाल जप्त केला.
कीर्ती गोल्ड कंपनीचे व इतर कंपन्यांचे १३ तेलाचे डबे. निळ्या व लाल रंगाच्या ८ पिशव्या, ज्यामध्ये ‘घडी डिटर्जंट’ आणि ‘घडी स्मार्ट निरमा पावडर’ होती. गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार.
या संपूर्ण कारवाईत एकूण ६,५९,६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही यशस्वी कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जतवार, सपोनि श्री. सचिन खटके, सपोनि श्री. स्वप्नील वाळके (अं.मु.शाखा), पोह/विनोद जानराव, नितीन जाधव, अमोल निंबाळकर, बबन जाधव, मनोज जगताप (अं.मु.शाखा), मपोह/शोभा बांगर आणि चापोह/महेबूब अरब, रोहीत दंडनाईक.
यांनी पार पाडली.
या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेशाखा धाराशिव पोलीस यांच्यावर जिल्हा भरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.







