Best News Portal Development Company In India

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात मुरूममध्ये ‘आरक्षण बचाव’ मोर्चा!

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात मुरूममध्ये ‘आरक्षण बचाव’ मोर्चा

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत मुरूम शहरात बुधवारी विविध सामाजिक संघटना, संविधानप्रेमी नागरिक आणि भीमसैनिकांच्या वतीने ‘आरक्षण बचाव मोर्चा’ काढण्यात आला. संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. त्यानंतर संविधान आणि सामाजिक न्यायाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.

सभेत मुकेश सोनकांबळे, भालचंद्र लोखंडे, धीरज बेळंबकर, उमेश सुरवसे, विश्वभूषण लिमये, गुरवे सर, एस. के. चेले, दिलीप भालेराव, कैलास शिंदे, दिनेश भालेराव, हरीश डावरे आणि आनंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण ही अनुसूचित जातीच्या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीची घटनात्मक हमी असून त्याचे उपवर्गीकरण स्वीकारार्ह नसल्याची भूमिका वक्त्यांनी मांडली. संविधानातील सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे संरक्षण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

सभेनंतर मोर्चाच्या वतीने मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चासकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे, आरक्षणाच्या घटनात्मक संरक्षणाला धक्का लागू देऊ नये आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

मोर्चाच्या आयोजनासाठी झुंबर बनसोडे, आनंद कांबळे, किरण गायकवाड, सुरज कांबळे, गौतम कांबळे, दिलीप भालेराव, प्रदीप गायकवाड, अभिजित कांबळे, अजय गायकवाड, गोपी कांबळे, अमोल बनसोडे, जयपाल सुरवसे, भारिप बहुजन महासंघाचे नेते रामभाऊ गायकवाड ,पंचायत समितीचे सदस्य कैलास शिंदे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. मोर्चाप्रसंगी महिला नागरिकांच्या मोठ्या संख्येने हा मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला.सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत भीम नगर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा निघाला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india