Best News Portal Development Company In India

बसव प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम: ७४४ गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ; महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मानवतेची साक्ष..

बसव प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम: ७४४ गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ; महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मानवतेची साक्ष…

​उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
, दि ८ (प्रतिनिधी) : महात्मा बसवेश्वरांनी जगाला दिलेला ‘कायकवे कैलास’ (कष्टातच ईश्वर आहे) हा विचार केवळ शब्दांत न ठेवता, तो कृतीतून सिद्ध करण्याचे काम मुरुम येथील बसव प्रतिष्ठानने केले आहे. बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील ७४४ गरजू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने शिक्षणप्रेमी आणि समाजमन जिंकले आहे.
​​महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली केली होती. याच महान विचारांचा वारसा पुढे चालवत डॉ. रामलिंग पुराणे यांनी आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थी हाच राष्ट्राचा खरा आधारस्तंभ आहे, त्यांना केवळ शिक्षणाची दारे उघडून देऊन चालणार नाही, तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन डॉ. पुराणे यांनी याप्रसंगी केले.
​बसव प्रतिष्ठानने मुरुम शहरातील विविध शाळांमधील ७४४ विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे संच भेट दिले. यामध्ये बॅग, पाणी बॉटल,वह्या, पेन, कंपास पेटी यासारख्या साहित्याचा समावेश होता. या उपक्रमात
जिल्हा परिषद शाळा १७०,
डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळा १६०, जिल्हा परिषद स्पेशल शाळा १३३, जिल्हा परिषद कन्या प्रशाला (माध्यमिक) १०२, जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा ६१, केंद्रीय प्राथमिक शाळा ५१, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (नाईकनगर) ५१, वसंत विद्यार्थी वसतिगृह १६ असे
एकूण ७४४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ​बसव प्रतिष्ठानने राबवलेल्या या उपक्रमामुळे ७४४ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमलले. शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या पालकांनीही प्रतिष्ठानच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुरुम शहरातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शवला. ​भविष्यातही अशाच प्रकारे समाजोपयोगी आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जातील, असा विश्वास डॉ. रामलिंग पुराणे यांनी व्यक्त केला आहे. बसव प्रतिष्ठानचे हे कार्य आजच्या काळात इतर संस्थांसाठी एक आदर्शवत प्रेरणा ठरत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india