श्री तुळजाभवानी चरणी २८१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अर्पण! उमरखेडच्या चिन्मय मूर्ती संस्थानकडून भक्तीचा अनुपम नजराणा.
तुळजापूर प्रतिनिधी :- साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या चरणी रविवारी (१२ जुलै) एका भाविकाकडून २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे देखणे मंगळसूत्र अर्पण करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानच्या वतीने हा भक्तीचा अनुपम नजराणा कुलस्वामिनीला समर्पित करण्यात आला.
रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड (जि. यवतमाळ) येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते आदिमाया श्री तुळजाभवानी मातेचा विधीवत अभिषेक आणि पूजा-अर्चा करण्यात आली. यानंतर स्वामीजींच्या उपस्थितीत देवीजींची भावपूर्ण ओटी भरण्यात आली.
२८१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र समर्पित
या मंगल प्रसंगी श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे कुलमुखत्यार ॲड. श्री महेश कनकदंडे आणि सौ. मोहिनीताई कनकदंडे यांनी अत्यंत भक्तीभावाने २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे भव्य मंगळसूत्र श्री तुळजाभवानी मातेस अर्पण केले.
मंदिर संस्थानकडून स्वामीजींचा सन्मान
या पवित्र सोहळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने परमपूज्य स्वामी महाराज यांच्या सुलभ दर्शनासाठी विशेष ‘डोलीची’ व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन आणि पूजा संपन्न झाल्यानंतर, मंदिर संस्थानच्या वतीने परमपूज्य स्वामी महाराज ,ॲड. श्री महेश कनकदंडे, सौ. मोहिनीताई कनकदंडे या सर्वांचा श्री देवीजींची पवित्र प्रतिमा आणि महावस्त्र (शाल) देऊन यथोचित आणि सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. या भक्तीमय सोहळ्यामुळे रविवारी मंदिर परिसरात भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.








