दिल्लीतील राष्ट्रीय लाठी अजिंक्यपद स्पर्धेत उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलची सुवर्ण कामगिरी!
६ सुवर्ण, ६ कांस्यपदकांसह धाराशिव जिल्ह्याला प्रथम क्रमांकाची मानाची ट्रॉफी; क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख व धनराज तेलंग यांच्या मार्गदर्शनाचा ठसा
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि. ११ व १२ जुलै २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा मालिका – ४ व द्वितीय राष्ट्रीय लाठी फेडरेशन चषक स्पर्धेत उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत ६ सुवर्ण व ६ कांस्यपदके पटकावली. या दैदिप्यमान यशाच्या जोरावर धाराशिव जिल्ह्याला प्रथम क्रमांकाची मानाची ट्रॉफी मिळवून देत विद्यार्थिनींनी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
देशभरातील विविध राज्यांतील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींच्या लाठी क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद हायस्कूलच्या कु. अस्मिता भोसले, कु. आनंदी कांबळे, कु. सृष्टी सूर्यवंशी, कु. गीता गायकवाड, कु. महेश्वरी पालमपल्ले आणि कु. शिवदर्शन शिंदे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदके पटकावली. तसेच इतर विद्यार्थिनींनी कांस्यपदके जिंकून संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ही राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम राहिली आहे. यापूर्वी तामिळनाडू राज्यातील सेलम येथे झालेल्या सहाव्या राष्ट्रीय लाठी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद, तसेच बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय तेंग सुडो शालेय क्रीडा स्पर्धेत ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कांस्यपदकांची कमाई करत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चमक दाखविली होती.
या उल्लेखनीय यशामागे क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख आणि धनराज तेलंग यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण, कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी अवघ्या एका वर्षात विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळा, तालुका आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, नगराध्यक्ष किरण गायकवाड, सभापती आकांक्षा चौगुले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर, शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, केंद्रप्रमुख शिला मुदगडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुजाता मोरे, शकुंतला मोरे, शिक्षणतज्ज्ञ सदानंद शिवदे पाटील, अशोक पतगे, बशीर शेख, विद्यानंद सुत्रावे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळविलेल्या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण उमरगा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, ही उल्लेखनीय कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.






