Best News Portal Development Company In India

श्री गजानन महाराज पालखीचे तुळजापूर येथे आगमन; मा. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक केले स्वागत!

श्री गजानन महाराज पालखीचे तुळजापूर येथे आगमन; मा. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक केले स्वागत!
तुळजापूर प्रतिनिधी ;- श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री गजानन महाराज पालखीचे आज श्रीक्षेत्र तुळजापूर येथे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी मा. जिल्हाधिकारी धाराशिव तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक पालखीचे पुष्पहार अर्पण करून श्रीफळ देत स्वागत केले.
यावेळी पालखीसोबत आलेल्या वारकरी, दिंडीप्रमुख व सेवेकऱ्यांचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगमनानंतर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर “गण गण गणात बोते” तसेच हरिनामाच्या गजराने भक्तिमय झाला होता.
सालाबादप्रमाणे यंदाही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने श्री गजानन महाराज पालखीतील वारकरी व सेवेकऱ्यांसाठी शिधा व्यवस्था करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उपेंद्र तामोरे यांनी सपत्नीक उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले. तसेच मंदिर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्रीमती माया माने, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव, वारकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मंगलमय कार्यात मंदिरातील आणि तुळजा – पुरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याचे पहावयास मिळाले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india