पंचायत समितीतील राड्याप्रकरणी ग्रामसेवक युनियन आक्रमक! खोट्या तक्रारी अन् धमक्यांविरोधात आज काळी फित लावून काम; ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा!
तुळजापूर (प्रतिनिधी): तुळजापूर पंचायत समिती कार्यालयात झालेल्या गोंधळ, शासकीय साहित्याचे नुकसान आणि गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) दिलेल्या थेट धमक्यांच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (शाखा तुळजापूर)’ अत्यंत आक्रमक झाली आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवार, २० जुलै २०२६ रोजी तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गळ्यात काळी फित लावून कामकाज करत तीव्र निषेध नोंदवला. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास संपूर्ण कामकाज बंद करून तीव्र ‘कामबंद आंदोलन’ छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या तुळजापूर शाखेने उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) साहेब, तुळजापूर विभाग यांना एक अधिकृत निवेदन दिले आहे.
एका प्रशासकीय चौकशीच्या विषयावरून काहींच्या टोळक्याने पंचायत समिती कार्यालयातील BDO यांच्या दालनात गोंधळ घालून शासकीय कागदपत्रे व साहित्याची तोडफोड केली होती. याप्रकरणी प्रशासनाने रीतसर कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.
परंतु, या कारवाईचा राग मनात धरून संबंधित व्यक्तींनी पोलिसांकडे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाच्या खोट्या तक्रारी दाखल करण्यासाठी अर्ज दिले आहेत. इतकेच नाही तर, एका व्हिडिओ बाईटमध्ये BDO यांना थेट आणि जाहीर धमक्याही दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ग्रामसेवक युनियनच्या प्रमुख मागण्या:
तात्काळ अटक करा: शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि अधिकाऱ्यांना ऑन-कॅमेरा जाहीर धमक्या देणाऱ्यांवर तात्काळ बिगरजामीनपात्र गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.
खोट्या तक्रारी फेटाळा: शासकीय कर्मचाऱ्यांना दबावात ठेवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी व विनयभंगाच्या खोट्या अर्जांची सखोल चौकशी करून ते तात्काळ फेटाळण्यात यावेत.
पोलीस संरक्षण द्या: शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी चोख पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.. “शासकीय यंत्रणेवर दबाव आणून लोकसेवकांचे मनोधैर्य खचवण्याचा हा प्रयत्न आहे. जर पोलीस प्रशासनाने या दबावतंत्राचा गैरफायदा घेणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई केली नाही, तर तुळजापूर तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत कामकाज बंद करून तीव्र आंदोलन छेडले जाईल.








