श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून दिवसभर कामबंद आंदोलन!
तुळजापूर प्रतिनिधी:- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज काळी फित लावून दिवसभर कामबंद आंदोलन केले. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान श्री कीर्ती किरण पुजार यांना निवेदन सादर केले.
निवेदनात दिनांक 18 जुलै 2026 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्या बाबत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच संबंधित व्यक्तीविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलनात संस्थानच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





