उमरगा तालुक्याला मराठवाड्यात नावलौकिक मिळवून देणार; एक ‘मॉडेल तालुका’ बनवण्यासाठी कटिबद्ध: आमदार बसवराज पाटील!
उमरग्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान व महा आरोग्य शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९५०० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी
उमरगा / लोहारा (प्रतिनिधी: आदिनाथ भालेराव):
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे, गरजू लाभार्थींपर्यंत विविध शासकीय योजना पारदर्शकतेने व वेगाने पोहोचवणे आणि प्रशासन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करणे या उद्देशाने उमरगा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर’ तसेच ‘महा आरोग्य शिबिर’ यशस्वीरीत्या पार पडले. “उमरगा तालुक्याला एक मॉडेल तालुका बनवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे,” असे ग्वाही माजी मंत्री व आमदार बसवराज पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे व राज्याचे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा आरोग्य विभाग, उमरगा-लोहारा तालुका महसूल विभाग आणि शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श महाविद्यालय, उमरगा येथे बुधवारी (दि. २२) या भव्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
आरोग्य सेवा व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण यावर भर
उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना आमदार बसवराज पाटील म्हणाले:
रुग्णालय विस्तार: “आमदार म्हणून काम करताना जागतिक बँकेच्या कर्जातून उमरग्यात १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर आणले होते, ज्याचा कोरोना काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आता हे रुग्णालय २०० खाटांचे करून महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा आपला मानस आहे.”
पाणंद रस्ते मजबुतीकरण: “मराठवाड्यात सर्वाधिक शेत पाणंद रस्त्यांची कामे आपल्या तालुक्यात झाली आहेत. ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद मुक्त योजने’च्या माध्यमातून या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी भरीव निधी आणून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.”
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक शरण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात ५ लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या लाभाचे आदेश वितरित करण्यात आले.
आरोग्य शिबिरात विक्रमी ९,५८५ रुग्णांची तपासणी
या महा आरोग्य शिबिरात लातूर, सोलापूर आणि धाराशिव येथील विविध आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली
उपक्रम / तपासणीसंख्या / तपशील
एकूण मोफत रुग्ण तपासणी९,५८५ रुग्ण (कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, नेत्र, बालरोग इत्यादी)
महारक्तदान शिबिर१०१ दात्यांचे रक्तदान
रक्त (शुगर) तपासणी३५६ जणांपैकी ३५ जणांना मधुमेह आढळला
छातीचे एक्स-रे५५ जणांपैकी ७ संशयित टीबी रुग्ण आढळले
आयुष्यमान भारत कार्ड१२० लाभार्थ्यांना वाटप
इतर तपासण्यादिव्यांग तपासणी (१०), UDID हँडीकॅप कार्ड (१०)
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांचे सह-अध्यक्ष शरण पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सागर नन्नवरे, तहसीलदार गोविंद येरमे, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल गरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, बसवराज कस्तुरे, विजयकुमार सोनवणे, रफिक तांबोळी, आप्पासाहेब पाटील, योगेश राठोड, बलभीम पाटील, प्राचार्य डॉ. राम सोलनकर, प्राचार्य श्रीराम पेठकर यांसह महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले, तर तहसीलदार गोविंद येरमे यांनी उपस्थितांचे आभार मानले.







