राष्ट्रवादी तर्फे मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबीर घेवुन स्व .अजितदादांची जयंती साजरी!
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादीतर्फे मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर ग्रामीण प्रशाला माडज येथे दि . २३ रोजी आयोजीत करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विठ्ठल गायकवाड तर या शिबिराचे मुख्य प्रशिक्षक प्रताप राठोड ,रफिक शेख , यांच्यासह
कमलाकर काळे, शमशोद्दीन जमादार, शफिक तांबोळी, राजेंद्र माने, बळी मारेकर, दिगंबर फुकटे, राजेंद्र जाधव, रमेश माने, दिनकर पाटील, रवी पाटील, दीपक माने, प्रशालेचे मुख्याध्यापक रामजी सोळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती .
“ आजच्या काळात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी परिवारातर्फे उमरगा आणि लोहारा तालुक्यातील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या सह विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून स्व.अजितदादा पवार यांना आम्ही आदरांजली अर्पण करीत आहोत.” अशा शब्दात सुरेशदाजी बिराजदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर प्रताप राठोड, मास्टर रफिक शेख, मास्टर साई राठोड आणि मास्टर अस्मिता ,अमोल पाटील हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.ग्रामीण प्रशाला माडज व जिल्हा परिषद माडज येथील मुलींना प्रशीक्षण देण्यात आले . दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये मुलींना ज्युडो ,कराटे ,काठी ,स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. बालाजी इंगळे यांनी केले. तर आभार अमोल पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, गावातील नागरिक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









