जळकोट बोरमन तांडा येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचा प्रेरणादायी उपक्रम…*
– – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट बोरमन तांडा येथील जि. प. प्रा. शाळा, येथे आषाढी एकादशीचे अवचीत साधुन यावर्षी पारंपरिक दिंडीला पर्यावरण आणि ज्ञानाची सुंदर जोड देत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
निसर्ग संवर्धनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा, वृक्षलागवडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे तसेच मुलांमध्ये वाचनाची आवड आणि ग्रंथप्रेमाची संस्कृती रुजावी, या उदात्त हेतूने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभाग घेत परिसरात पर्यावरण संवर्धन व ज्ञानप्रसाराचा संदेश दिला. या प्रेरणादायी सोहळ्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी पुणे येथे संगणक अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री. मोहन जाधव यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी १०१ पुस्तकांचा संच भेट देऊन ज्ञानदानाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना राजगिऱ्याच्या लाडूंचे वाटप करून आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित केला.
याचबरोबर श्री. महादेव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना, धाराशिव यांच्या वतीने शाळेतील एकल पालक तसेच अनाथ विद्यार्थ्यांना स्कुलबॅग, अर्धा डझन वह्या व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या संवेदनशील व समाजाभिमुख उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला.
तसेच गावातील युवा उद्योजक श्री. प्रदीप जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सविता राजू राठोड यांनी विद्यार्थ्यांना केळींचे वाटप केले. श्री. दासू चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना बिस्किटांचा खाऊ देत या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या लोकसहभागाचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.







