धाराशिव जिल्ह्यातील वगळलेल्या मंडळांना तात्काळ पीकविमा द्या; उमरगा /लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी .
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तसेच MahaDBT व पोकरा पोर्टलवर ‘फार्मर आयडी’ डाटा Fetch होत नसल्याने शेतकरी त्रस्त; तातडीने बैठक घेण्याचे कृषी मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पीकविमा वितरणात झालेला अन्याय दूर uकरावा, पीकविमा २०२५ मधून वगळण्यात आलेल्या महसुली मंडळांना तात्काळ विमा मंजूर करावा, तसेच लोहारा तालुक्यातील ‘अग्रिस्टेक’ नोंदणीतील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आमदार प्रवीण स्वामी यांनी राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (दत्ता मामा) भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली.
पीकविमा २०२५ मधून अन्यायाने वगळण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांना तात्काळ पीकविमा मंजूर करून मदत वितरित करण्यात यावी.
पीकविमा मंजूर झालेल्या विविध मंडळांमधील रकमेत मोठी तफावत दिसून येत आहे. ही तफावत तत्काळ दूर करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समान व योग्य न्याय मिळावा.
लोहारा तालुक्यात’अग्रिस्टेक’ अंतर्गत ‘फार्मर आयडी’ काढताना सतत सर्व्हर डाऊन व तांत्रिक त्रुटी येत आहेत. यामुळे फार्मर आयडीचा डाटा MahaDBT आणि पोकरा (PoCRA) पोर्टलवर FETCH होत नाहीये, परिणामी शेतकरी विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कृषी मंत्र्यांकडून तातडीने बैठकीचे निर्देश:
आमदार प्रवीण स्वामी यांनी मांडलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (दत्ता मामा) भरणे यांनी MahaDBT व पोकरा पोर्टलवरील तांत्रिक अडचणी व फार्मर आयडी Fetch न होण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
“धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाला त्याचा हक्क मिळेपर्यंत आणि सर्व प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत आपला हा लढा असाच सुरू राहील,” असा ठाम निर्धार उमरगा /लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी या वेळी व्यक्त केला.






