धाराशिवमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्याला तासाभरात बेड्या; शहरात पोलीस कारवाईचा धडका!
तुळजापूर प्रतिनिधी:- बंद घराचे कुलूप तोडून आत शिरत मोबाईल, रोख रक्कम आणि घड्याळे लांबवणाऱ्या सराईत चोराच्या धाराशिव शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत. गणेश नगर परिसरात घडलेल्या या घरफोडीप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
गणेश नगर, धाराशिव येथील रहिवासी सागर राम साळुंके (वय ३०) हे दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत आरोपी राजेश परमेश्वर बनसोडे (वय २६, रा. साठे चौक, धाराशिव) याने साळुंके यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपीने घरातील २ मोबाईल फोन, १,२०० रुपये रोख आणि दोन मनगटी घड्याळे असा एकूण १५,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
याप्रकरणी फिर्यादी सागर साळुंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्हा दाखल होताच धाराशिव शहर पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी राजेश बनसोडे याला तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच आरोपीने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
पोलीस या प्रकरणी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम करत असून, या गुन्ह्याचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.






