पवनचक्कीचे साहित्य चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी:-स्थानिक गुन्हे शाखेने सतर्कता बाळगत वाशी व येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवनचक्कीचे साहित्य चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कॉपर केबल, रॉड, वायर आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण ४,४८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे पवनचक्की चोरीचे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
झाडीत लपलेल्या टोळीचा सिने स्टाईलने पाठलाग केला अन् मुसक्या आवळल्या.
दिनांक ०७/०८/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, अनसुर्डा शिवारातील फॉरेस्टमध्ये पवनचक्कीच्या पॉईंटवरून चोरी करणारी टोळी दाट झाडीत थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पथकाने फॉरेस्टजवळ वाहने थांबवून पायी चालत जात धाड टाकली. पोलिसांना पाहताच दाट झाडीतून पळून जाणाऱ्या संशयितांचा पथकाने पाठलाग करून अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
खाक्या दाखवताच उघड झाला मुद्देमाल
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अभिलेखावरून तपासणी केली असता, त्यांच्यावर धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतही चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी नंदू रामा शिंदे याने खामकरवाडी येथील स्वतःच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी पवनचक्कीचे कॉपर केबल, रॉड आणि तार लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने खामकरवाडी येथे जाऊन छापा टाकत सर्व साहित्य आणि बोलेरो जीप जप्त केली.
अटक करण्यात आलेले आरोपी-
१. अनिल नाना काळे (वय ४० वर्ष, रा. मस्सा)
२. नंदू रामा शिंदे (रा. खामकरवाडी)
३. बबलू उर्फ राम शिवाजी शिंदे (वय २९ वर्ष, रा. खामकरवाडी)
४. श्याम उर्फ बाबा शंकर शिंदे (वय २८ वर्ष, रा. खामकरवाडी)
जप्त मुद्देमाल: पवनचक्कीचे कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप (एकूण किंमत ₹४,४८,०००/-).
पोलीस पथकाचे कौतुक
सदरची धडक कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे तसेच चालक पोलीस अंमलदार महेबूब अरब, प्रकाश बोईनवाड आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.






