दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राइक! दोघे गजाआड; १० जणांची टोळी निष्पन्न.
तुळजापूर प्रतिनिधी:- दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकावर दगडफेक करून पसार झालेल्या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. गुप्त बातमीदाराच्या आधारे मारलेल्या छाप्यात दोन मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, या कारवाईमुळे एकूण १० आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.
दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले होते. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी त्यांच्यावर जोरदार दगडफेक केली आणि अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे दरोड्यासाठी लागणारे हत्यारे व साहित्य आढळून आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१०(४), ३१०(५), १२१, ३२४ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दि. ९ ऑगस्ट रोजी सपोनि सुदर्शन कासार व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कन्हेरवाडी (ता. कळंब) शिवारात धाड टाकून:
१. रामा उर्फ बेल्या शंकर काळे (वय २३)
२. सरदार शंकर काळे (वय २८)
(दोघे रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण १० आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक कागदपत्रांसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ही यशस्वी कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोह नागनाथ गुरव आणि रत्नदीप डोंगरे यांनी पार पाडली. या कारवाईमुळे सर्वत्र स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांचे कौतुक होत आहे.







