Best News Portal Development Company In India

काटीतील घनकचरा कुंड्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार? निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर ग्रामस्थ संतप्त! ठेकेदार अन् अधिकाऱ्यांची चौकशी करा; २१ ऑगस्टला तुळजापुरात धडक आंदोलनाचा इशारा!

काटीतील घनकचरा कुंड्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार? निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर ग्रामस्थ संतप्त!
ठेकेदार अन् अधिकाऱ्यांची चौकशी करा; २१ ऑगस्टला तुळजापुरात धडक आंदोलनाचा इशारा
तुळजापूर  प्रतिनिधी:- तुळजापूर तालुक्यातील मौजे काटी येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या सिमेंट-काँक्रीटच्या घनकचरा कुंड्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत (सन २०२२-२३) काटी गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी सिमेंट-काँक्रीटच्या कुंड्यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून, सिमेंटचे प्रमाण अतिशय कमी ठेवण्यात आल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच या कुंड्यांची दुरवस्था झाली असून, त्या मजबूत व टिकाऊ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
“ग्रामपंचायत कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे केवळ ठेकेदारच नव्हे, तर कामाची पाहणी आणि मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद आहे.”— तक्रारदारांचा आरोप
चौकशीच्या प्रमुख मागण्या-
निधीचा ताळेबंद:- कामासाठी मंजूर झालेला निधी, झालेला प्रत्यक्ष खर्च आणि कामाचा दर्जा याची निष्पक्ष पडताळणी व्हावी.
जबाबदारी निश्चिती:- दोषी ठेकेदारासह काम तपासणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
प्रशासकीय पाठपुरावा: धाराशिवचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद प्रशासन आणि तुळजापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा उपविभागाला निवेदनाद्वारे कारवाईची विनंती.
२१ ऑगस्टला आंदोलनाचा एल्गार!
याप्रकरणी धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने यावर तात्काळ योग्य ती पावले उचलली नाहीत, तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी पंचायत समिती तुळजापूर येथील पाणीपुरवठा उपविभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा समितीने दिला आहे.
आता या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर तुळजापूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण काटी गावासह तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india