प्रभाग क्र. ९ मधील नागरिकांची आरोग्य हेळसांड थांबवा; ‘शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र’ तात्काळ सुरू करा!
नगरसेविका सौ. जयश्रीताई कंदले यांची मुख्याधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी; शाळा क्र. २ च्या इमारतीत तात्पुरता दवाखाना सुरू करण्याचा प्रस्ताव.
तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये एकही शासकीय अथवा खाजगी दवाखाना उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांची आरोग्याची मोठी हेळसांड होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रभाग क्र. ९ मध्ये शासनाचे ‘शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र’ (UHWC) तात्काळ मंजूर करून सुरू करावे, अशी जोरदार मागणी नगरसेविका सौ. जयश्रीताई विजय कंदले यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिकांची गैरसोय अन् वाढती लोकसंख्या
नगरसेविका जयश्रीताई कंदले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक ९ ची लोकसंख्या सुमारे ५ ते ६ हजार इतकी आहे. या प्रभागात शाळा, महाविद्यालये, मोठे पार्किंग आणि मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी (स्लम एरिया) आहे. उपचारासाठी नागरिकांना लांब अंतरावर जावे लागत असल्याने गरीब व सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागात आरोग्य केंद्र असणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
दवाखान्यासाठी जागेचा पर्यायही उपलब्ध!
आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी जयश्रीताई कंदले यांनी जागेचे दोन महत्त्वाचे पर्याय सुचवले आहेत.
तत
सध्या रिकामी असलेली ‘शाळा क्रमांक २’ ची इमारत तात्पुरत्या स्वरूपात दवाखान्यासाठी वापरण्यात यावी.
कायमस्वरूपी सोय- छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेट्रोल पंपामागील समाज मंदिर सुसज्ज करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ उभे केले जाऊ शकते.
”प्रभाग ९ मधील नागरिकांचे आरोग्य हेच आमचे प्राधान्य आहे. शासनाकडून आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर करून घेण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने संबंधित विभागाकडे त्वरित प्रस्ताव पाठवावा, जेणेकरून ५ ते ६ हजार नागरिकांना वेळेवर उपचार मिळतील.” — सौ. जयश्रीताई विजय कंदले (नगरसेविका, प्रभाग क्र. ९, न.प. तुळजापूर)
प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आता प्रभागातील नागरिकांमधूनही जोर धरू लागली आहे.







