भाविकाची कुलस्वामिनीशी अनोखी भक्ती! श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केला ९६७ ग्रॅमचा चांदीचा टोप.
तुळजापूर प्रतिनिधी :- ‘आई राजा उदे उदे’च्या जयघोषात श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी आणखी एक मौल्यवान भेट अर्पण करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पांगरे येथील भाविक श्री. अभिजीत विलास काकडे यांनी देवीच्या मूर्तीसाठी ९६७ ग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा टोप भक्तिभावाने अर्पण केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत काकडे हे आपल्या सहकुटुंबासह कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी देवीची शास्त्रोक्त पद्धतीने ओटी भरून, कुलधर्म व कुलाचार पाळत श्रींचे दर्शन घेतले. या धार्मिक विधीनंतर त्यांनी ९६७ ग्रॅम वजनाचा सुंदर चांदीचा टोप श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी समर्पित केला.
या वेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने काकडे प्रकरणाचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी महेश गंजे यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी व इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजाभवानी देवीवरील अपार श्रद्धेतून काकडे कुटुंबाने अर्पण केलेल्या या चांदीच्या टोपामुळे मंदिर परिसरात आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.






