ढोकीमध्ये टास्क फोर्सचा मोठा छापा: अलिशान बंगल्यातून ६९ लाखांचा गांजा, चरस, सोने व जुगाराचे साहित्य जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी:- अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धडक कारवाई; आरोपी बाप्पा पवारवर गुन्हा दाखल.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) छत्रपती संभाजीनगर विभागाने ढोकी (जि. धाराशिव) येथे गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) सकाळी अत्यंत मोठी आणि धाडसी कारवाई केली. ढोकी येथील १३ तेरणानगर भागात असलेल्या एका आलिशान दुमजली बंगल्यावर छापा टाकून पोलिसांना ६९ लाख १९ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. या प्रकरणी बाप्पा शंकर पवार नावाच्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोण्यांमध्ये लपवला होता गांजा अन् चरस!
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने १३ ऑगस्ट रोजी सकाळी ०७:२० वाजता आरोपी बाप्पा पवार याच्या बंगल्याची झडती घेतली. यावेळी घरात ठेवलेल्या गोण्यांमधून ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा आणि १३१ ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले. इतकेच नव्हे तर, अंगझडतीदरम्यान २१ तोळे सोने आणि रोख रक्कम असा एकूण ६९,१९,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बंगल्याच्या दुसरया मजल्यावर सुरू होता जुगार क्लब!
कारवाईदरम्यान पोलिसांना आणखी एक धक्कादायक बाब आढळून आली. आरोपीच्या या अलिशान बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबवर सर्रास पत्त्यांचा जुगार क्लब चालवला जात होता. तेथून जुगार खेळण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात आरोपी बाप्पा पवार याच्याविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा आणि चरस कोठून आणला गेला आणि तो कोणाला विक्री केला जाणार होता, याचा अधिक तपास अंमली पदार्थ विरोधी कृती दल (ANTF) करत आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह मॅडम, पोलीस उपमहानिरीक्षक श्री. प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक श्री. अजीज टिके, DYSP श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत, पोलीस अंमलदार नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रवींद्र साळवे, राहुल काळे, अतुल तुपे, हरीश मुंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्योती कीर्तीकर, प्रियंका पवार आणि आम्रपाली सूर्यवंशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.







