Best News Portal Development Company In India

उमरगा तालुक्यातील पीकविमा रक्कमेतील तफावतीबाबत आमदार प्रविण स्वामी आक्रमक; कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी!

उमरगा तालुक्यातील पीकविमा रक्कमेतील तफावतीबाबत आमदार प्रविण स्वामी आक्रमक; कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी!

उमरगा / लोहारा आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील विविध मंडळांतील शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेली पीकविमा भरपाई रक्कम आणि प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यांवर जमा झालेली रक्कम यात मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे शेतकरी वर्ग संतप्त असून, स्थानिक आमदार प्रविण स्वामी यांनी या प्रश्नावर तात्काळ पुढाकार घेत राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांची भेट घेतली व शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा करण्याची मागणी केली.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आमदार प्रविण स्वामी यांची भेट घेऊन बँक पासबुकच्या नोंदी दाखवत शासनाने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा कमी रक्कम खात्यात जमा झाल्याची तक्रार केली होती. हक्काच्या मदतीपासून बळीराजा वंचित राहत असल्याचे पाहून आमदार स्वामी यांनी थेट कृषीमंत्र्यांचे लक्ष या समस्येकडे वेधले.

शासन निर्णयानुसार (GR) मंजूर झालेली पूर्ण रक्कम आणि प्रत्यक्षात जमा झालेली रक्कम यातील फरक शोधून उर्वरित रक्कम तात्काळ वर्ग करावी,विमा कंपनी व बँकिंग प्रणालीतील तांत्रिक गोंधळामुळे (Technical Glitches) किंवा आधार सीडिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांचे पैसे तुटले असल्यास त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी.
तालुका कृषी अधिकारी व संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा.
या बैठकीदरम्यान कृषीमंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, “उमरगा- लोहारा तालुक्यातील एकाही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही; तांत्रिक त्रुटींची तातडीने तपासणी करून योग्य ती भरपाई खात्यावर जमा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात येतील,” असे आश्वासन दिले.
“शेतकरी आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटांनी होरपळला आहे. अशा स्थितीत शासनाने जाहीर केलेली मदत पूर्णपणे न मिळणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. जोपर्यंत तालुक्यातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याच्या खात्यावर हक्काचा शेवटचा रूपया जमा होत नाही, तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा शांत बसणार नाही.”
— आमदार प्रविण स्वामी, उमरगा/लोहारा विधानसभा मतदारसंघ

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india