Best News Portal Development Company In India

मुरूम येथे शरण पाटील फाउंडेशन च्या वतीने मेहंदी कार्यक्रम संपन्न!

मुरूम येथे शरण पाटील फाउंडेशन च्या वतीने मेहंदी कार्यक्रम संपन्न!
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
महाराष्ट्रात पवित्र श्रावण महिन्यात नागपंचमी आणि मंगळागौर सण अत्यंत उत्साहात साजरे केले जाते. नागपंचमीला विशेष सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून श्रावण शुद्ध पंचमीला नागाला देवता मानत समृद्धी, संरक्षण आणि फलनशीलतेसाठी नागांची पूजा करत नागपंचमी सण साजरा केला जातो. तर नवविवाहित महिला याच महिन्यातील प्रत्येक मंगळवारी माता पार्वती आणि शिव यांची पूजा करून व्रत करत मंगळागौर साजरी करत असतात. महिलांवर्गात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या दोन्ही सणांच्या निमित्ताने शरण पाटील फाउंडेशनच्या संचालिका संपदा शरण पाटील व स्मिता बापुराव पाटील यांच्या पुढाकाराने रविवारी (दि १६) येथील रत्नमाला मंगल कार्यालयात युवती व महिलांसाठी मेहंदी कार्यक्रम पार पडला.
सामाजिक उपक्रमातून महिलांशी संवाद साधत भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी शरण पाटील फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मेहंदी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रचना राठोड, पं स सदस्या रेखा मुळे, नगरसेविका ज्योती शेळके, अंकिता अंबुसे, सुनीता बने, निर्मला कंटेकुरे, समीना मुल्ला, आशा समन्विका सोनाली भिसे, डॉ शिल्पा स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. नागपंचमी व मंगळागौर सण स्त्रियांसाठी श्रद्धेचा आणि सौंदर्याचा सण आहे. सणवार आणि कार्यक्रमात स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारा मेहंदी कार्यक्रम हा आनंदाचा सोहळा आहे. मेहंदी स्त्रियांच्या सौंदर्य शास्त्रातील एक महत्त्वपूर्ण घटक असून हातावरील मेहंदी किती रंगली आहे हा बहुसंख्य महिलांच्या चर्चेचा विषय असतो. लाह्या, दुधाचे नैवेद्य दाखवत नागपंचमी साजरी केली जाते. तर माता पार्वती गौरी आणि शिव पूजा करून झिम्मा, फुगडी खेळत गाणी गात मंगळागौर साजरी केली जाते. भारतीय सणांना अध्यात्मिक महत्त्व असून या सणात पुराणकथा, लोककथा, आणि पर्यावरणीय जाणीव यांचा समन्वय दिसून येत असतो. नागपंचमी आणि मंगळागौर या महिलांच्या सणांच्या औचित्याने शरण पाटील फाउंडेशनच्या पुढाकाराने गेल्या दोन वर्षांपासून मेहंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात आशालता वारद यांनी वेगवेगळ्या डिझाइन मध्ये महिलांच्या हातावर मेहंदी काढली. कार्यक्रमात मुरूम व परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

चौकट
नागपंचमी हा सण मुख्यत्वे नागदेवतेला समर्पित आहे. भगवान शिवशंकर नेहमी गळ्यात नाग धारण केलेल्या रुपात दिसतात. या दिवशी नागाला देवता मानून पूजा केली जाते. तर मंगळागौर हे नवविवाहित महिलांचे विशेष व्रत आहे. अखंड सौभाग्य, पतीला दीर्घायुष्य आणि घरात सुख शांती लाभावी यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी सकाळी माता पार्वती गौरी आणि शिव यांची सोळा उपचारांनी षोडशोपचार पूजा करून व्रत केले जाते. नागपंचमी आणि मंगळागौर या स्त्रियांसाठी श्रद्धेचा आणि सौंदर्याचा सण आहे. सौंदर्य आणि संस्कृतीचे सुंदर मिश्रण असलेला हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा या उद्देशाने शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने युवती व महिलांसाठी आजचा हा मेहंदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. – सौ संपदा शरण पाटील.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india