आमदार प्रवीण स्वामी ‘वीरशैवश्री’ तर ह.भ.प. गहिनीनाथ महाराज ‘विठ्ठल सेवा’ पुरस्काराने सन्मानित.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
मुंबई यशवंतराव चव्हाण सभागृह येथे अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा’ (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात आमदार प्रवीण स्वामी यांना समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अत्यंत मानाच्या ‘वीरशैवश्री’ पुरस्काराने, तर अध्यात्म आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रातील अद्वितीय सेवेबद्दल विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘विठ्ठल सेवा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा दिमाखदार सोहळा काशी पीठाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ ज्ञानसिंहासनधिश्वर जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पावन व दिव्य उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद कर्नाटक सरकारचे ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री तथा महासभेचे अध्यक्ष मा. श्री. ईश्वर बी. खंद्रे यांनी भूषवले.
समाजाची सेवा, लोककल्याणकारी कामे आणि सामाजिक एकोप्यासाठी आमदार प्रवीण स्वामी यांनी केलेले कार्य, तसेच ह.भ.प.गहिनीनाथ महाराज यांनी वारकरी संप्रदाय व समाजप्रबोधनासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार स्वामी म्हणाले, “हा सन्मान म्हणजे संपूर्ण जनतेचा व समाजबांधवांचा गौरव आहे. पूज्य जगद्गुरूंचे आशीर्वाद आणि ह.भ.प. गहिनीनाथ महाराजांसारख्या संतांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे.”
या सोहळ्यास महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध लोकप्रतिनिधी, संत-महंत आणि वीरशैव-लिंगायत समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त दोन्ही मान्यवरांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







