Best News Portal Development Company In India

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
पुण्यात २२ऑगस्ट रोजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता, यामध्ये मनुस्मृतीचा दाखला देत त्यांनी पुरुषसत्ताक वर्चस्व संपवण्यावर विधान केले होते. मात्र हा मुद्दा आंबेडकरी चळवळीचा आहे, गेली अनेक दशके मनुस्मृती विरोधात आंबेडकरी चळवळ लढत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे काही सटीक मुद्दे मांडले आहेत. त्यांनी म्हटले की, “पुरोगामी राजकारणा”च्या नावाखाली गेली अनेक दशके बाबासाहेब आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरी स्त्रीवाद्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि नंतर एखाद्या उच्चवर्णीय नेत्याने त्याच गोष्टी पुन्हा मांडल्या की त्याचे कौतुक करायचे यापेक्षा मोठा विरोधाभास कोणता मुद्दे. उच्चवर्णीय काँग्रेसच्या ‘डिलिव्हरी सिस्टिम’मधून आले तरच लोक ऐकतात. मग ते आधी कितीही वर्ष आंबेडकरी चळवळी ने मांडलेले असोत! ऐसा कैसा चलेगा?
अंजलीताई आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे की, “बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी सार्वजनिकरित्या मनुस्मृतीचे दहन केले होते. आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, विशेषत महिलांनी, अनेक दशकांपासून मनुस्मृतीवर सातत्याने टीका केली आहे. १९९८ पासून भारिप बहुजन महासंघाच्या आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या महिला २५ डिसेंबर- ‘मनुस्मृती दहन दिन’ हा ‘भारतीय स्त्री मुक्ती दिन ‘ म्हणून साजरा करत आहेत आणि मनुस्मृती दहन दिन हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून घोषित करावा, ही मागणी करत आहेत. तेव्हा राज्यात काँग्रेस सत्तेत असतानादेखील काँग्रेसने कधीही औपचारिकरीत्या मनुस्मृतीचा निषेध केला नाही किंवा भारतीय स्त्री मुक्ती दिनाची देखील दखल घेतली नाही.
आता राहुल गांधींनी केवळ निवडणुकी मध्ये फायद्यासाठी आंबेडकरी चळवळीने दशकानुदशके वापरलेल्या आणि लढ्यांतून विकसित केलेल्या संकल्पनांचे आणि त्यातील शब्दावलीचे श्रेय घेतले आहे. २०२४ पूर्वी त्यांनी मनुस्मृती विरुद्ध ठाम टीका केल्याचे माझ्या वाचनात नाही. आता ही भूमिका आणि विचारपरीवर्तन प्रामाणिक असेल तर त्यांचा पक्ष ही भूमिका गाव/ वस्ती पातळी पर्यंत नेईल अशी आशा करायला हरकत नाही.
पुण्यात राहुल गांधींनी जातिवादी आणि पितृसत्ताक मनुस्मृतीवर योग्य टीका केली. पण त्याच्या काही दिवस आधीच त्यांनी आरएसएसला मी कधीही संपुष्टात येऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती आणि मनुस्मृतीच्या मूल्यांचा प्रसार करणाऱ्या आरएसएसच्या अभिव्यक्तीचे संरक्षण करण्याची ग्वाही दिली होती.
उच्चजातीय स्त्रीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी यांच्याकडून आंबेडकरवादी आणि दलित स्त्रीवाद्यांकडे दुर्लक्ष केले जाते, पण ज्या भूमिका आंबेडकरी चळवळीने दशकानुदशके जोपासल्या, त्यासाठी आंबेडकरवादी अनेक दशकांपासून लढत आहेत, त्याच गोष्टी जेव्हा राहुल गांधी बोलतात, तेव्हा हे लोक त्यांची दीर्घ आणि स्तुतिपर लेखने लिहिण्यासाठी चढाओढ असते.
यातून उच्चजातीय स्त्रीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी वर्गाच्या बौद्धिक प्रामाणिकतेबद्दल आंबेडकरी कार्यकर्त्यांनी काय निष्कर्ष काढायचा
• या निवडक मान्यतेतून उच्चजातीय नेतृत्वा बद्दल आणि काँगेस बद्दल असलेले त्त्यांचे सातत्यपूर्ण प्राधान्य नेमक काय दर्शवते? ह्यातून तळागाळात काम करणाऱ्या आणि काँगेस सह उदारमतवादी सेक्युलर पक्षांच्या सरंजामी वृत्तीचा पदोपदी अनुभव येणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी काय समजायचे?
. फुले शाहू आंबेडकरी चळवळीने अनेक दशके चालविलेल्या ह्या चळवळीत आम्ही तेंव्हाच सहभागी होऊ जेंव्हा त्यांचे नेतृत्व उच्चजातीय असेल किंवा त्याला लाभ काँग्रेस आणि काँगेस प्रणित आघाडीला होईल ही तर मानसिकता नाही ना?”
प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या वक्तव्यातून पुरोगामी आणि सेक्युलर राजकारणातील एका महत्त्वाच्या विरोधाभासावर बोट ठेवले आहे. आंबेडकरी चळवळीने, विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी, मनुस्मृतीविरुद्धचा लढा आणि ‘भारतीय स्त्री मुक्ती दि. (२५ डिसेंबर) साजरा करण्याची मागणी गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने लावून धरली आहे. परंतु, जेव्हा हेच विचार आणि लढा एखाद्या उच्चवर्णीय किंवा काँग्रेससारख्या प्रस्थापित पक्षाच्या नेत्याकडून मांडला जातो, तेव्हाच त्याला मुख्य प्रवाहातील पुरोगामी, समाजवादी आणि उदारमतवादी वर्गाकडून मान्यता आणि कौतुक मिळते, असा थेट आरोप त्यांनी केला आह.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india