तुळजापूर तालुक्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा धाडसी छापा; ३ जणांवर गुन्हे दाखल, साहित्यासह दारू जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी:-
तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मद्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून बेकायदेशीर दारू जप्त केली आहे. या कारवाईत तिघांवर ‘महाराष्ट्र मद्य मनाई कायद्या’न्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या बाजूला रोडवर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी वच्छला ज्ञानोबा राउत (वय ७०, रा. काक्रंबा) यांच्या ताब्यातून बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली १,९०० रुपये किमतीची १९ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
सिंदफळ येथे देशी-विदेशी दारूच्या २१ बाटल्या जप्त-
त्याच दिवशी दुपारी ४:३० वाजता सिंदफळ येथे मारलेल्या छाप्यात चंद्रकांत इरप्पा सिध्दगणेश (वय ५६, रा. सिंदफळ) याच्याकडून ८४० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या २१ शिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
शेताच्या बांधावर अवैध दारू विक्रीचा प्रयत्न उधळला-
दिनांक २३ ऑगस्ट रोजीच दुपारी १:३० वाजता सिंदफळ येथील ओमराजे अनिल भोसले यांच्या शेत गट नं. ५६९ समोरील बांधावर कारवाई करण्यात आली. या वेळी विठ्ठल शिवाजी देवकर (वय ३७, रा. सिंदफळ) याच्या ताब्यातून १,१२० रुपये किमतीच्या २८ शिलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
तुळजापूर पोलिसांनी तिन्ही कारवायांमध्ये अवैध मद्यसाठा जप्त केला असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम ६५(ई) अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात ३ स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.






