Best News Portal Development Company In India

सेवालाल चौक ते धाराशिव रोड उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणाची औदुंबर कदम यांची मागणी; सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन!

सेवालाल चौक ते धाराशिव रोड उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणाची औदुंबर कदम यांची मागणी; सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन!
​तुळजापूर प्रतिनिधी :-
तुळजापूर शहरातील सेवालाल चौक ते धाराशिव रोड उड्डाणपुलादरम्यान असणारा अरुंद रस्ता आणि वाढते अपघात लक्षात घेता, या मार्गाचे तातडीने चौपदरीकरण करण्यात यावे व पुरेशी विद्युत व्यवस्था करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नगरपरिषद तुळजापूरचे गटनेते श्री. कदम औदुंबर पंडितराव यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे केली आहे.
​धाराशिव मार्ग आणि लातूर बायपास मार्गे येणारी बहुतांश वाहने याच मार्गाने शहरात प्रवेश करतात. मात्र, सेवालाल चौक ते उड्डाणपूल दरम्यानचा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चालू महिन्यातच या ठिकाणी झालेल्या दोन गंभीर अपघातांमध्ये प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
​नजीकच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिंता
येत्या दोन महिन्यांवर आलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त धाराशिव मार्गाने हजारो भाविक पायी चालत तुळजापुरात येतात. हा रस्ता अरुंदच राहिल्यास नवरात्रौत्सवात मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
​भाविकांची सुरक्षा आणि तुळजापूरकरांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी या रस्त्याचे तातडीने चौपदरीकरण (4-Lane) करून योग्य विद्युत व्यवस्था उभारावी, अशी विनंती निवेदनाद्वारे प्रशासनाला करण्यात आली आहे. याप्रसंगी श्री औदुंबर पंडितराव कदम नगरसेवक तथा गटनेते, तुळजापूर नगर परिषदेच्या नगरसेविका नीताताई दिनेश शिरसागर, नगरसेवक लखन (भैया) पेंदे इत्यादी उपस्थित होते.

(दिनांक: २० ऑगस्ट २०२६ रोजी हे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागात दाखल करण्यात आले आहे.)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india